श्री तुळजाई दुर्ग सामाजिक योद्धा पुरस्काराने ह.भ.प. अरुण काळे महाराज सन्मानित
भूम : आलम प्रभू यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी (दि. १३ डिसेंबर २०२५) शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान, भूम तालुका यांच्या वतीने पूरग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात “आजचा युवक आणि छत्रपती शिवरायांचे कार्य” या विषयावर श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, संकल्पक व संस्थापक विठ्ठल बाराते यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करावे तसेच गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा “श्री तुळजाई दुर्ग सामाजिक योद्धा पुरस्कार – २०२५” हा ह.भ.प. अरुण काळे महाराज यांना संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना ह.भ.प. अरुण काळे महाराज यांनी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान व विठ्ठल बाराते यांच्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात बोलताना प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान व विठ्ठल बाराते यांचे कार्य अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार काढत पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. मनोगतात विठ्ठल बाराते यांनी निस्वार्थी, सुसंस्कारित, निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न युवक समाजात घडावा, ही अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी तसेच श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस औताडे, अभिषेक सुरवसे, प्रशांत शेळके, निलेश औताडे, अनिकेत आकरे, अभी कराळे, शुभम अंधारे, रामराजे कुंभार, यश भांगे आदी पदाधिकारी व शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अरुण काळे महाराज यांनी विलोभनीय शब्दांत केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















