पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात गँगस्टर बंडु आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तरीही त्याच्या टोळीच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. सोमवारी रात्री पोलिसांनी बंडु आंदेकर याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात २ पिस्तुले, १ एअरगन, १७ लाख रुपयांची रोकड, १८ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू व इतर साहित्य असा एकूण ३७ लाख ४७ हजार ९४९ रुपयांचा माल जप्त केला आहे.
आयुष कोमकर याचा खून झाल्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये समर्थ पोलिसांनी बंडु आंदेकर याच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी २ लाख रुपयांची रोकड, ८५ लाख रुपये किमतीचे ७७ तोळे (७७० ग्रॅम) सोन्याचे दागिने, तसेच साठेखत, पॉवर ऑफ अटर्नी, बँकेची पासबुक, एक कार, विविध करारनामे व टॅक्स पावत्या सापडल्या होत्या.
या कागदपत्रांचा तपास केल्यानंतर बंडु आंदेकर व त्याच्या टोळीवर खंडणीचे आणखी काही गुन्हे दाखल झाले आहेत. आंदेकर टोळीची दहशत संपवण्याचा पुणे पोलिसांचा निर्धार आहे. तसेच महापालिका निवडणुकीत बंडु आंदेकर व त्याचे पुत्र उमेदवारी करण्याची शक्यता असल्याने या नव्या छाप्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या आंदेकर टोळी येरवडा कारागृहात आहे. तन्मय कांबळे याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तन्मय गणेश कांबळे (वय २३, रा. गणेश पेठ) याला ताब्यात घेतले.
शस्त्राबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ते शस्त्र एका अल्पवयीन मुलाकडे दिल्याचे सांगितले. त्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पिस्तुल स्वराज वाडेकर याच्या ‘हीच आईची इच्छा’ नावाच्या चार मजली इमारतीत ठेवले असल्याचे त्याने सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणाहून २ पिस्तुले व २ जिवंत काडतुसे असा सुमारे ८० हजार रुपयांचा माल जप्त केला. ही पिस्तुले अमन युसुफ पठाण याने दिल्याचेही निष्पन्न झाले. यानंतर समर्थ पोलीस, गुन्हे शाखा युनिट-१ व खंडणीविरोधी पथक यांनी संयुक्तपणे आंदेकर टोळीतील स्वराज वाडेकर याच्या ‘हीच आईची इच्छा’ या घरावर छापा टाकला.
या कारवाईत २ पिस्तुले, १ एअरगन, १५ लाख रुपयांची रोकड व १८ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू असा एकूण ३७ लाख ४७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते करीत आहेत.
















