मोफत वस्तूचे आमिष दाखवून ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेची दोघांनी केली फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुढे साहेब लोक आहेत, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, अशी बतावणी करत दोघांनी ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला मोफत वस्तूचे आमिष दाखवत १ लाख २० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले.
याबाबत एका ७२ वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्वयंपाकाचे काम करतात. १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्या पायी कामाला जात होत्या. वाटेत एक जण त्यांच्या जवळ आला.
चंदननगर परिसरात साडी व किराणा मालाचे गरीबांसाठी वाटप सुरू आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला ते मिळवून देतो, असे त्याने सांगितले. तेव्हा त्यांनी साडी व किराणा माल नको, असे त्याला सांगितले. मात्र, त्यानंतर काही एक न समजता त्या भामट्याच्या मागे जाऊ लागल्या.
थोडे अंतर गेल्यानंतर ‘पुढे साहेब लोक आहेत. तुमच्याकडील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा,’ असे त्याने सांगितले. त्यावर या महिलेने कानातील सोन्याचे टॉप्स, वेल तसेच गळ्यातील रामअक्षर व मणी असे एकूण १ लाख २० हजार रुपयांचे दागिने काढून बॅगमध्ये ठेवू लागल्या.
त्यावेळी त्याने दागिने स्वतः बॅगमध्ये ठेवतो, असे सांगून ते त्यांच्या हातातून घेतले. मात्र दागिने बॅगमध्ये न ठेवता तो खराडी बायपास रोडकडे निघून गेला. तो पळून जात असताना काही अंतरावर उभा असलेला त्याचा साथीदारही त्याच्याबरोबर पळून गेला.
महिलेने ‘चोर, चोर’ असे म्हणत काही अंतर त्यांचा पाठलाग केला, पण दोघेही पसार झाले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.















