हवेली पोलिसांची कामगिरी : व्याजाने घेतले होते ५ लाख रुपये
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : व्याजाच्या पैशासाठी अपहरण करणाऱ्या सराईतांना हवेली पोलिसांनी कोल्हेवाडी पकडून तरुणाची सुटका केली. पुढील कारवाईसाठी हवेली पोलिसांनी सराईत गुंडासह दोघांना पकडून भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केले आहे.
राहुल संजय पवार (वय ३९, रा. म्हाळुंगे, ता. खेड) आणि नितीन पोपट तांबे (वय ३३, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, रोहताष कुमार (रा. चिखली) याने राहुल पवार व नितीन तांबे यांच्याकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते.
त्याने ते व्याजासह परत दिले होते. तरीही ते पैसे परत मागत होते.
त्याला कुमार याने नकार दिला. त्यामुळे या दोघांनी बुधवारी सायंकाळी कुमार याला जबरदस्तीने गाडीत घालून त्याचे अपहरण केले. त्याला निमगाव, खेड, चाकण, खेडशिवापूर येथे फिरवले. त्यानंतर त्याला खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथे आणले होते. भोसरी पोलिसांनी ही माहिती हवेली पोलिसांना दिली. या माहितीनुसार, हवेली पोलीस शोध घेत असताना त्यांना एक संशयास्पद कार पुण्याकडे जाताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून त्यातील लोकांची चौकशी केल्यावर ज्यांचा शोध घेत आहोत, तेच आरोपी कारमध्ये असल्याचे पोलिसांना लक्षात आले. हवेली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन भोसरी पोलिसांच्या हवाली केले आहे.
