येरवडा पोलिसांत फिर्याद : पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थीनीवर चाकूने वार करुन तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच एका तडीपार गुंडाने एका तरुणीच्या घरात शिरुन तूझे लग्न कोठेही होऊन देणार नाही, अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मोहसीन खान (रा. जिजामातानगर, नवी खडकी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोहसीन खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याला तडीपार केले आहे. असे असताना तो रविवारी शहरात आला. फिर्यादीच्या घरी येऊन घराचा दरवाजा वाजवला असताना फिर्यादीच्या आईने दरवाजा उघडला. मोहसीन याने त्यांच्या आईला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले. त्याला फिर्यादीच्या आईने नकार दिला. तेव्हा त्याने आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यांचा आवाज ऐकून फिर्यादी या बाहेर आल्या असताना त्यांचा हात पकडून अंगावरील गाऊन ओढून विनयभंग केला. फिर्यादी यांना ‘‘मै तेरी शादी किदर भी होने नही दुंगा’’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 
			

















