गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई : आरोपीकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सोहेल नासीर शेख (वय २०, रा. तोहीद हाईट्स, कोंढवा, पुणे) आणि फैजान अहमद शेख (वय २१, रा. मलिकनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट-५चे अधिकारी-कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी मोबाईल, एक्साईड बॅटरी, इलेक्ट्रिक मोटारी चोरणारे शीतल पेट्रोल पंपाजवळ थांबले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून १० हजार रुपयांचा मोबाईल, १० हजार रुपयांची इलेक्ट्रिक मोटार, पाच हजार रुपयांची एक्साईड कंपनीची बॅटीर, २५ हजार रुपयांची होंडा डिओ मोपेड असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एक्साईड बॅटरी रिलायन्स स्टोअर येथून, तर एनआयबीएम रस्त्यावर पादचाऱ्याच्या हातातून मोबाईल चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीवर कोंढवा पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास गाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार आश्रुबा मोराळे, रमेश साबळे, महेश वाघमारे, दयाराम शेगर, चेतन चव्हाण, पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 
			

















