वानवडी हद्दीतील घटना : चार परप्रांतीयांवर गुन्हा दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
तुमच्या बीएसएनएल सीमकार्डची मुदत संपली असून, 24 तासात ते बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरु ठेवण्यासाठी ऑनलाईन अॅक्टिवेशन बंद असल्याने ऑफलाईन करावे लागेल, असे सांगून पुण्यातील सायबर भामट्याने पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन तब्बल 10 लाख 85 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार पुण्यात फेब्रुवारी 2021 मध्ये वानवडी परिसरात घडला आहे.
याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालसा देवी (रा. नवी दिल्ली), जयंता दे (रा. वेस्ट बंगाल), संतोष कुमार, अंबुनाथ टुटु, संजय कुमार यादा (रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर फसवणूक आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला या कुटुंबासमवेत वानवडी परिसरात राहतात. 4 फेब्रुवारी रोजी त्यांना एकाने व्हॉट्सअॅवर बीएसएनएल कंपनीचा लोगो पाठवून कोथरुड बीएसएनएल कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्याने तुमचे सिम कार्ड बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरु ठेवायचे असल्यास दिलेल्या क्रमांकावर फोन करा. सध्या ऑनलाइन अॅक्टिवेशन बंद असून ऑफलाईन करावे लागेल असे सांगून, महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरट्याने घेऊन सायबर चोरट्याने महिलेच्या आयसीआयसीआय बँक व एसबीआय बँकेच्या
एटीएम कार्डचा आणि क्रेडीट कार्डचा सीव्हीसी क्रमांक घेतला. त्यानंतर 10 लाख 85 हजारांचे ऑनलाईन ट्रानझेक्शन करुन महिलेला ऑनलाई गंडा घातला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. महिलेच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन वानवडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड करीत आहेत.