व्याजासह सर्व रक्कम चुकती करूनही केली अजून पावणेदोन लाख रुपयांची मागणी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कर्जाची पन्नास हजारांची संपूर्ण रक्कम व्याजासह परत करूनदेखील अजून पावणेदोन लाख रुपयांची मागणीकरणाऱ्या आणि आठ टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडून कारवाई केली आहे.
गाडीतळ, हडपसर, पुणे येथील फिर्यादीने डिसेंबर २०१९ मध्ये सावकार उमाकांत राजू गायकवाड (रा. अरणेश्वर, पुणे) याच्याकडे ५०,००० रुपये मागितले असता त्याने फिर्यादीस आठ टक्के व्याजाचे ४००० रुपये अगोदरच कपात करून फिर्यादीस मोबाईल बँकिंगद्वारे त्याच्या अकाउंटवर ४६,००० रुपये ट्रान्सफर केले होते. त्यानंतर फिर्यादी प्रतिमहिना ४००० असे जमा करत होता, असे सावकार उमाकांत गायकवाड यास ६४ हजार रुपये परत करूनदेखील फिर्यादीकडे आणखीन एक लाख ८० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत फिर्यादीने खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा येथे तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जावर वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
सदर अर्जावरून फिर्यादीने सावकार उमाकांत राजू गायकवाड याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने त्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत औचरे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, महिला पोलीस आशा कोळेकर यांनी केलेली आहे.
