हडपसर-मांजरीमधील प्रकार : सुरक्षारक्षकाचा प्रताप, भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक केलेल्याने दुकानाच्या भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला. ज्वेलर्समधील १२ लाख रुपयांचे दागिने, रोकड चोरुन पत्नीला घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सुनील सोमनाथ सोनवणे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विरेंद्र बहाद्दूर शहा व त्याची पत्नी (रा. नेपाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोनवणे यांचे घुलेनगरमधील आकासिया इमारतीत श्री स्वामी कृपा ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. विरेंद्र शहा याला या इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात आले असून तो तेथेच रहात होता. त्याने १ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते २ डिसेंबर सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद असताना पाठीमागील भिंतीला भोक पाडले. त्यातून आत प्रवेश केला. दुकानातील मुख्य लोंखडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. ती न फुटल्याने काचेच्या काऊंटरमधील ६ लाख २ हजार ७०० रुपयांचे १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ लाख ३१ हजार ५० रुपयांचे ७ किलो चांदीचे दागिने आणि ७० हजार ५०० रुपये असा एकूण १२ लाख ४ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरी करुन घेऊन गेला. जाताना तो आपल्या पत्नीलाही घेऊन पळून गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.














