चंदननगर पोलिसांची कामगिरी : एक लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चंदननगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक लाख ५१ हजार रुपयांचा माल हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
भालचंद्र मोकाशी (वय ३०, रा. सोमेश्वरनगर, करंजे, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी खराडी परिसरात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत तपास केला. त्यावेळी त्याने अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील कर्वेनगर येथून एका महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अर्जुन बुधवंत, बबन केदार, महेश नाणेकर, सागर तारू, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














