अमलीपदार्थ विरोधी पथक-१ची कारवाई : १५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज पीएमपी स्थानकातून जाणाऱ्या बसेसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत कर्नाटकमधील मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळून १५ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१ने ही धडाकेबाज कारवाई केली.
नागेश आप्पाना (वय २५, रा. मशिद कॉलनी, ता. गुत्ते, जि. गतकुल, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक-१चे अधिकारी स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी परराज्यातील व्यक्ती इर्टिगामधून पीएमपी बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट बसथांब्याजवळ थांबलेल्या इर्टिगामध्ये संशयित व्यक्ती आढळून आली. त्याला ताब्यात घेून अधिक तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार लाख ८५ हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे ३८ मोबाईल, दहा लाख रुपये किमतीची ईर्टिगा कार, त्याचे स्वतःचे २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कात्रजमधून पीएमपी बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरल्याची आरोपीने कबुली दिली. शिवाजीनगर, भारती विद्यापीठ व इतर पोलीस स्टेशनमध्ये नऊ गुन्हे दाखल असून, मोबाईल मालकांशी संपर्क साधून गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, प्रवीण उत्तेकर, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
