बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी शिवतेजनगर, बिबवेवाडी येथून १२, १५, आणि १५ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याशी संबंधित अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथक प्रमुख अशोक येवले आणि तपास पथकातील सर्व अमलदार, तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी मिळून अल्पवयीन मुलींचा शोध सुरू केला.
बेपत्ता मुलींच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मुलींचा शोध घेत असताना, त्या अंबिवली, कल्याण (जि. ठाणे) येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी खडकपाडा पोलीस ठाणे, कल्याण येथे संपर्क साधून मुलींचे वर्णन सांगितले. त्यानंतर त्या अंबिवली येथून ताब्यात घेऊन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सुखरूप आणण्यात आल्या.
या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सावंत करीत आहेत. सदर कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अमलदार विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, अभिषेक धुमाळ, प्रतिक करंजे, तसेच महिला पोलीस अमलदार वर्षा ठोंबरे यांनी योगदान दिले.

















