उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; डॉ. चंद्रतेज कदम यांची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र जैन वार्ता
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नामवंत नामको हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांत ५० एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यातील दोन रुग्णांवर सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिससारख्या जटिल आजारावरदेखील एण्डोस्कोपीद्वारे यशस्वी सर्जरी करण्यात आली.
या उपचारपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अत्याधुनिक उच्च-तंत्रज्ञानाधारित असून, ती उत्तर महाराष्ट्रात प्रथमच उपलब्ध करून देण्याचे श्रेय हॉस्पिटलमधील एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. चंद्रतेज कदम यांना जाते. या उल्लेखनीय कामगिरीची माहिती रुग्णालयाचे सचिव शशिकांत पारख यांनी सोमवारी (दि. २१) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया मोफत, तर इतर रुग्णांसाठी माफक दरात उपलब्ध आहे. या अत्याधुनिक पद्धतीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशानेच नामको हॉस्पिटलतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दक्षिण कोरियामधून एण्डोस्कोपिक स्पाईन सर्जरीची फेलोशिप आणि दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधून एम.सी.एच. न्यूरोसर्जरीचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. कदम यांना उल्लेखनीय वैद्यकीय सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष रवींद्र गोठी, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. विशाखा जहागिरदार, सीईओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक, जनरल मॅनेजर (ॲडमिन) समीर तुळजापूरकर, न्युरो फिजिओथेरपीस्ट डॉ. पुष्पक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पारंपरिक पद्धतीने मणक्यांवरील शस्त्रक्रिया करताना मोठा चीरा, स्नायू वा हाडे कापणे, रक्तस्त्राव आणि रुग्णालयात ५ दिवसांपर्यंत थांबावे लागणे, हे सगळे त्रासदायक टप्पे असतात. मात्र, एण्डोस्कोपिक सर्जरीमुळे केवळ लहान छेद देऊन ही प्रक्रिया पार पडते आणि ती अत्यंत कमी त्रासदायक ठरते.
या पद्धतीद्वारे डॉ. कदम यांनी अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या सी-३, सी-४, सी-५ आणि सी-६ या सर्व्हायकल व्हर्टिब्रावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे, ८३ व ८४ वर्षांच्या वृद्ध रुग्णांसह एका २७ वर्षीय तरुणालाही त्यांनी व्याधीमुक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णांना डिस्चार्ज मिळतो.
डिजिटल युगातील बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, मोबाईल व संगणकाचा अतिवापर आणि चुकीच्या बसण्याच्या सवयींमुळे आता ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्येही सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. पूर्वी ज्यांना ५०-६० वयानंतर ही समस्या भेडसावत होती, तीच आता तरुण पिढीला भोगावी लागत आहे.
मानदुखी, पाठदुखी, हातापायाला मुंग्या येणे, हाताची पकड सैल होणे, थोडे चालल्यानंतर लगेच बसावेसे वाटणे, आणि आजार गंभीर झाल्यास तोल जाणे, अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
“रुग्णांनी दुखणे अंगावर न काढता वेळेत निदान करून उपचार घ्यावेत, जेणेकरून शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही किंवा तीही अत्यंत सोप्या पद्धतीने करता येईल,” असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.
सायटिका, सर्व्हायकल पेन, पाठीच्या गंभीर व्याधी यांवरही एण्डोस्कोपिक सर्जरी प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिव शशिकांत पारख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामको हॉस्पिटलमध्ये लवकरच न्युरो रिहॅब सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची योजना असून, त्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्ती सुभाष रुणवाल यांनी संपूर्ण आर्थिक सहाय्य देण्याची ग्वाही दिली आहे.
