कोंढवा, हडपसर, वानवडी परिसरातील कारवाई; आतापर्यंत ९४ गुन्हेगारांवर कठोर कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोंढवा, वानवडी आणि हडपसर परिसरातील ६ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तडीपार केले आहे.
इम्तीयाज इद्रीस मेमन (वय ४५, रा. विठ्ठलनगर, हडपसर) याच्यावर खंडणी, फसवणूक आणि शिवीगाळ यासारखे एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
गणेश बबन लोंढे (वय २४, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर) याच्यावर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, चोरी, दुखापत, खाजगी मालमत्तेचे नुकसान, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि बलात्कार अशा एकूण १९ गुन्ह्यांची नोंद आहे.
अविनाश अजय मिसाळ (वय २४, रा. घोरपडी बाजार) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे ४ गुन्हे दाखल आहेत. हुसेन अब्बास पटेल (वय २३, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याच्यावर दुखापत, मारहाण, धमकी देणे आणि गावठी हातभट्टीच्या दारूची बेकायदेशीर विक्री यासह ५ गुन्हे दाखल आहेत.
आकाश नरसय्या गुत्तेदार (वय २४, रा. पवारवस्ती, केशवनगर, मुंढवा) याच्यावर गावठी हातभट्टीची दारू विक्री यासंदर्भात ४ गुन्हे दाखल आहेत. आदित्य तानाजी पांडागळे (वय २०, रा. काटे चाळ, कोंढवा खुर्द) याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, मारहाण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशत निर्माण करणे यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत.
हे सर्व गुन्हेगार पोलीस रेकॉर्डवरील असून, आगामी गणेशोत्सव व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत परिमंडळ ५ मध्ये १३ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, ९ मोका कारवायांमध्ये ५६ गुन्हेगारांना तुरुंगात डांबण्यात आले असून, २५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. एकूण ९४ सराईत गुन्हेगारांवर ठोस व प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
