कोंढव्यात खळबळजनक प्रकार : अदखलपात्र गुन्हा नोंद, न्यायालयाच्या परवानगीने तपास सुरू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कुरिअर बॉयच्या वेषात घरी आलेल्या तरुणाने स्प्रे मारून अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या एका तरुणीची तक्रार खोटी ठरली आहे. पोलिस तपासात समोर आले की, तो तरुण तिचाच ओळखीचा मित्र असून, संपूर्ण घटना तिच्या संमतीने घडली होती. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
२ जुलै रोजी संध्याकाळी कोंढवा परिसरात घडल्याचा दावा करत तरुणीने तक्रार दिली होती की, कुरिअर घेऊन आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिला बेशुद्ध करुन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने तिच्या मोबाईलवर अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून त्यावर धमकीवजा मजकूर लिहिल्याचेही तिने सांगितले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी तपास करताना तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅट, कॉल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १ जुलै रोजी तिने आरोपीला घरी येण्यासाठी आमंत्रण दिले होते. तिनेच “घरी कोणी नसताना एक्स्ट्रा कपडे घेऊन ये” असा संदेश पाठवलेला आढळला. त्यामुळे आरोपी हा कुरिअर बॉय नसून तिचाच जुना मित्र असल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीने दिलेल्या खोट्या माहितीनंतर ५०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले. २५० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
नंतर पोलिसांनी सत्य समजल्यावर खोटे पुरावे तयार करून दिशाभूल केल्याबद्दल संबंधित तरुणीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२, २१७, २२८, २२९ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला. प्रकारामुळे पोलिस यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून, तरुणीने हेतुपुरस्सर व जाणूनबुजून बनावट माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील तपास न्यायालयाच्या परवानगीने करण्यात येणार असून, खोट्या तक्रारीद्वारे पोलिसांचा गैरवापर करणे हा गंभीर प्रकार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस तपासात निष्पन्न झालेल्या महत्त्वाच्या बाबी :
आरोपी कुरिअर बॉय नसून तिचा ओळखीचा मित्र होता.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांना देखील तिने स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले.
आरोपीने तिच्या संमतीने रात्री १९:५३ वाजता अर्धनग्न अवस्थेतील फोटो तिच्याच मोबाईलवरून काढला.
आरोपी २०:२७ वाजता मेनगेटमधून बाहेर जातानाचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध.
फोटो २०:२७:५३ वाजता काढलेला असून, त्यावर धमकीचा मजकूर तिनेच टाईप केला.
डेटा रिकव्हरीद्वारे मूळ फोटो सापडले, ज्यात दोघांचे चेहरे स्पष्ट आहेत.
फोटो एडिट करताना आरोपीचा चेहरा दिसू नये यासाठी तिनेच फोटो क्रॉप व फेरबदल केला.
सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा फोटो ओळखूनही तिने पोलिसांकडे त्याला ओळखत नसल्याचे खोटे सांगितले.
