‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रमातून पर्यावरणप्रेम व सामाजिक बांधिलकीचा संदेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम येथील प्राईड इंग्लिश स्कूलच्या वतीने ग्रीन डेच्या निमित्ताने दिनांक 21 जुलै रोजी कन्हेरी घाट येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्राईड इंग्लिश स्कूलतर्फे ग्रीन डे साजरा करताना “एक विद्यार्थी – एक वृक्ष” या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या हाताने झाडे लावली. हिरवाईने नटलेला कन्हेरी घाट, जो बालाघाट डोंगररांगामधील एक सुंदर निसर्गस्थळ आहे, तिथे हा उपक्रम पार पडला.
वृक्षारोपणाला सुरुवात करण्यापूर्वी, शाळेच्या प्रांगणात ग्रीन डे निमित्त विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसेच हिरव्या रंगाशी संबंधित विविध खेळणी, पालेभाज्या आणि घरून आणलेले हिरव्या रंगाचे पदार्थ यांचे आकर्षक सादरीकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी “सेव्ह ट्रीज”, “गो ग्रीन” अशा पर्यावरणपूरक घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, जंगलांचे रक्षण आणि प्रदूषणमुक्त भविष्य घडवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला. निसर्गाच्या सान्निध्यात ग्रीन डे साजरा करताना वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांना पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली.
या उपक्रमाचे आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षिका मेघा सुपेकर, दीपिका टकले, भाग्यश्री डांगे तसेच सेविका अरुणा बोत्रे आणि आशा म्हेत्रे यांनी मोलाचे योगदान दिले.
