गो रक्षकाचे काम करणाऱ्या पाच जणांकडून बेदम मारहाण : कोंढव्यातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवर विवादास्पद कॉमेंट केल्याने गो रक्षक कार्यकर्त्यांनी बजरंग दलाचा सदस्य असलेल्या १७ वर्षांच्या युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘‘तू परत भेट, तुला मारून टाकतो,’’ अशी धमकी दिली. फिर्यादी व आरोपी तरुण सर्वजण एकत्र असतात. केवळ इन्स्टाग्रामवरील कॉमेंटवरून त्यांच्यात वाद झाला आहे.
याबाबत १७ वर्षीय युवकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ऋषी कामठे (वय २९, रा. हडपसर), प्रसाद नाईक (वय २२, रा. साळवे गार्डन, कोंढवा), आकाश पवार (वय २५, रा. कोंढवा), राहुल कदम (वय २६, रा. आंबिकानगर, अप्पर), कुणाल पाटील (वय २४, रा. साळवे गार्डन, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोंढव्यातील ग्रेसिया सोसायटीच्या पार्किंगमध्ये रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवकाचे ९ वीपर्यंत शिक्षण झाले असून सध्या तो काही काम करत नाही.
तो बजरंग दलाचा सदस्य असल्याचे सांगतो, तर आरोपी हे गो रक्षक म्हणून कार्य करतात. या युवकाचा मित्र स्वयम दळवी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एप्रिल महिन्यातील रामनवमीचा फोटो टाकला होता. त्यावर या युवकाने रविवारी दुपारी ‘हाकाललेली संस्था’ अशी कॉमेंट केली होती.
यानंतर ऋषी कामठे याचा युवकाला फोन आला व ‘‘तु इन्स्टाग्रामवर कॉमेंट का टाकली? तु भेटायला ये,’’ असे सांगितले. तेव्हा युवकाने त्याला आपण बाहेर असल्याचे सांगितले. सायंकाळी पावणे सहा वाजता त्याचा मित्र राकेश शुक्ला याने फोन करून सांगितले की ऋषी कामठे, प्रसाद नाईक व आकाश पवार हे भेटायला पार्किंगमध्ये आले आहेत. ‘
‘तू खाली ये, ते माझे चांगले मित्र आहेत. तुला काही करणार नाहीत,’’ असे त्याने म्हटले. तेव्हा हा युवक त्यांना भेटण्यासाठी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आला. त्यावेळी ऋषी कामठे याने ‘‘तु इन्स्टाग्रामवर काय कॉमेंट टाकली?’’ असे विचारले.
त्यावर त्याने ‘‘मी कसली कॉमेंट टाकली?’’ असे विचारल्यावर त्याला कानाखाली मारली. त्यानंतर त्याच्या नाकावर जोरात बुक्की मारल्याने त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. तो खाली पडल्यावर इतरांनी त्याला पोटात, पाठीवर, तोंडावर व डोक्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी त्याचे वडील, आई आणि मित्र यांनी येऊन त्याला सोडवले. दरम्यान, आकाश पवार याने त्याच्या गाडीला लावलेली स्टिक काढून अंगावर धावून जात ‘‘मला तू परत भेट, तुला मारून टाकतो,’’ अशी धमकी दिली. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
