तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून मृत्यू, ठेकेदारांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून जिन्याने खाली उतरताना मोबाईल पाहणे एका कामगाराच्या जीवावर बेतले. जिना उतरताना तोल जाऊन तो लिफ्टच्या डकमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून पोलिसांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
गेंदमनी रघुराई साकेत (वय २९, रा. पर्वती दर्शन, मुळ रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत प्रदुम्न रघुराई साकेत (वय २३, रा. पर्वती दर्शन, मुळ रा. सिधी, मध्यप्रदेश) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी पृथ्वीराज धनंजय काकडे आणि संतोष हरीशचंद्रा कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पर्वती दर्शन येथील ओंकार असोसिएट्सच्या एसआरए बिल्डिंगमध्ये ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन येथे एसआरएची बिल्डिंग बांधकामाधीन आहे. इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तेथे जिन्याच्या मधोमध लिफ्टसाठी डक ठेवण्यात आला आहे. त्याच्या भोवती जिना आहे. लिफ्टसाठी ठेवलेल्या डकमध्ये सेफ्टी जाळी बसवलेली नव्हती.
काम संपल्यावर गेंदमनी साकेत हा जिन्यावरून खाली उतरताना मोबाईल पाहत होता. मोबाईल पाहत असताना त्याचे लक्ष गेले नाही. तिसऱ्या मजल्यावरून तो लिफ्टसाठी ठेवलेल्या डकमध्ये तोल जाऊन पडला. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
लिफ्टच्या डकच्या बाजूला सेफ्टी जाळी न बसवल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोपनर तपास करत आहेत.
