8 लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-२ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ओझे कुश (हायब्रीड) गांजा, मेफेड्रॉन तसेच एलएसडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई मंगळवारी (दि.23) रात्री 11 च्या सुमारास पुण्यातील विद्यानिकेतन शाळेजवळील सार्वजनिक रोडवर केली. या कारवाईत 8 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुंदन गौतम कोकाटे (वय-23 रा. ट्रांझीस्ट कॅम्प, ए विंग म्हाडा कॉलनी, नवघर पोलीस स्टेशन समोर, मुलुंड, मुंबई), तपन जितेंद्र पंडित (वय-34 रा. साईकृपा सोसायटी, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी परिमंडळ 4 व 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मयुर सुर्यवंशी यांना माहिती मिळाली की, विद्या निकेतन शाळेजवळील सार्वजनिक रोडवर गोल्डन इनोव्हा कार (एमएच 04 सीएम 1944) मध्ये दोन व्यक्ती असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता 1 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे एलएसडी, एमडी, ओझीकुश (हायब्रीड) इंडिगो डॉमीनंट फ्लेव्हर गांजा असा अमली पदाथ आढळून आला. पोलिसांनी इनोव्हा कार, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व दोन मोबाईल असा एकूण 6 लाख 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायलयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदिप शेळके, साहिल शेख, महेश साळुंखे, आझीम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














