पुण्यातील कल्याणीनगरमधील घटना : कॉल सेंटर फेक आहे, असे म्हणत केली तोडफोड
महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क
पुणे : कल्याणीनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये शिरुन हे कॉल सेंटर फेक आहे. तुम्ही सगळे बाहेर व्हा. तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देऊन कार्यालयातील कर्मचार्यांना मारहाण करुन तोडफोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता कल्याणीनगरमधील एका कॉलसेंटरमध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
युवराज प्रमोद नायडु (वय २६, रा. राजवर्धन हाईटस, टिंगरेनगर), गणेश प्रकाश मोघे (वय २७, रा. मंगळवार पेठ) आणि सिद्धांत सतिश लालबिगे (वय २२, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कॉल सेंटरच्या दरवाजाचे लॉक तोडून तिघे जण कार्यालयात शिरले. तेथे असलेल्या कर्मचार्यांना शिवीगाळ करुन “हे कॉल सेंटर फेक असून तुम्ही सगळे बाहेर व्हा, नाही तर तुम्हाला बघुन घेऊ,” अशी धमकी दिली. कार्यालयामधील प्लायवुड, कॉम्प्युटर, झाडांच्या कुंड्या मारुन तोडफोड केली. तेथील कर्मचार्यांना हाताने मारहाण केली. युवराज नायडु याने तेथील एका तरुणीच्या पोटाला धरुन तू आतमध्ये चल असे म्हणून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक लिटे तपास करीत आहेत.















