अँटी करप्शनची कारवाई : इंजिनिअरच्या शासकीय लायसन्सचा प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागितली लाच
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागून 15 हजार स्वीकारताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे कार्यालयातील दोन लिपिकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई करण्यात आली असून दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कनिष्ठ लिपिक तानाजी गोविंदराव दबडे (वय-50) आणि प्रथम लिपिक विलास दगडू तिकोणे (वय-50) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या लाचखोर लिपिकांची नावे आहेत. याप्रकरणी 45 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारदार यांचा मुलगा इंजिनियर असून, त्याचा सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवायचा होता. प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग एक येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातील लिपिक विलास तिकोणे याने तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यानंतर अधीक्षक अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपिक तानाजी दबडे याने प्रस्ताव मंजूरीस ठेवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने पडताळणी केली. त्यावेळी तानाजी दबडे याने अधीक्षक अभियंता यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीस ठेवण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तर आरोपी तिकोणे याने दबडे याला लाच मागण्यास प्रोत्साहीत केले. दबडे याने तडजोड करुन 15 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने दोघांना ताब्यात घेतले.
लाचखोरांना घरी पाठवा…
शासकीय पगार असताना लाच घेणाऱ्यांकडून विनापगार काम करून घेतले, तर अशा प्रकारांना आळा बसू शकेल. अन्यथा ही कीड कधीच संपणार नाही. भरमसाठ पगार, सवलती मिळत असल्यानेच त्यांचा मस्तवालपणा वाढला आहे. अशा विकृती थांबविण्याची आज गरज निर्माण झाली आहे, असा सल्ला सूज्ञ नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
