बाजीराव रोडवरील घटना : विश्रामबाग पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बाजीराव रोडवरील चितळे चौकातून पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना बेड्या ठोकल्या. बाजीराव रस्त्यावरील चितळे चौकात शुक्रवारी (दि. ३ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अली अजगर इकबाल नजे (वय ३८, रा. रोहिदास वाडा, ठाणे), यासीन इमाम शेख (वय २४, रा. हाजी मलंगवाडी, अंबरनाथ, ठाणे), राज ऊर्फ राजेश राधेश्याम सिंग (वय ३५, रा. चेंबूर, वाशीनाका), रवींद्र वसंत पांचाळ (वय ५०, रा. काळा तलाव, कल्याण (प.) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश उपळकर (वय ५९, रा. शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, उपळकर हे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चितळे चौक येथील शालगर दुकानाचे समोरील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी घरी जात होते. त्यांच्याकडील कापडी पिशवीत ५० हजार रुपये होते. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते पायी जात असताना आरोपी मोटारसायकलवरुन पाठीमागून आले. त्यांच्या हातातील पैसे असलेली कापडी पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली व ते पळून गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने परिसरातील फुटेज तपासले. त्यात ही घटना कैद झाली होती. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.
