वारजे पोलिसांत गुन्हा : मोबाईल कंपनीकडून माहिती संकलित करीत असल्याचे सांगून लुबाडले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाइल कंपनीकडून ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पाडण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पावणे अकरा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार वारजे भागात राहायला आहेत. गेल्या महिन्यात ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला. मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पडेल, अशी बतावणी चोरट्याकडून करण्यात आली. चोरट्याने त्यांना एक लिंक पाठविली. लिंक उघडण्यास सांगण्यात आले. त्यावर असलेला फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने बँक खात्याची गोपनीय माहिती फॉर्मवर भरून दिला.
या माहितीचा गैरवापर करून चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून दहा लाख ७१ हजार २६९ रुपये लांबविले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
