भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅपवरच्या स्टेटसवर तलवारीचे फोटो टाकून दहशत निर्माण करणार्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली, असून त्याच्याकडून विनापरवाना असलेली तलवार जप्त करण्यात आली आहे.
07 ऑगस्ट रोजी तपासपथकाचे अधिकारी नितीन शिंदे आणि स्टाफ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कात्रज गावातील एका इसमाने सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅपवर तलवारीसह फोटो टाकून त्यावर ‘कात्रज किंग…. सगळ्याचा बाप.. पोलीस आयेगी बत्ती लगाकर तो बोलने का माया भाई आया था,’ असे पिक्चर स्टाईलद्वारे स्टेटस टाकून कात्रज परिसरामध्ये दहशत निर्माण करीत होता आणि तो तलवारीसह कात्रज स्मशानभूमीजवळ पिवळ्या रंगाचा शर्ट घालून उभा आहे, अशी बातमीदारामार्फत बातमी पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांना मिळाली असता, सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना सांगितली असता, त्यांनी त्यास सदर ठिकाणी जावून ताब्यात घेण्याबाबत सांगितले.
सदर बातमीच्या आशयाने पोलीस संबंधित ठिकाणी गेले असता, तेथे पिवळ्या रंगाचा इसम हातामध्ये तलवार घेऊन दहशत करताना दिसून आल्याने त्याच्याजवळ जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाऊ लागला. त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ एक लोखंडी तलवार मिळून आल्याने त्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे चौकशी करून त्याने पोलीस सहआयुक्त पुणे शहर यांनी त्यांचेकडील कार्यालयीन आदेशाचा भंग करून स्वतःचे ताब्यात विनापरवाना तलवार घेऊन मिळून आल्याने सरकारी फिर्यादी म्हणून पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांनी फिर्याद दिल्याने त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा याचेकडे देण्यात आला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार अभिजित जाधव, रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, योगेश सुळ, गणेश शेंडे, राहुल तांबे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत यांनी केली आहे.