बार्शी शहर पोलिसांची कामगिरी : सव्वा लाखाच्या मुददेमालासह आरोपी जेरबंद
बार्शी : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
अट्टल मोटरसायकल चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले असून, एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
4 ऑगस्ट रोजी बार्शी शहरामध्ये पेट्रोलिंग दरम्यान संशयित एक इसम त्याच्याकडील काळ्या रंगाची सीबी शाईन मोटरसायकलवरून जात असता त्याला पकडून चौकशी केली असता, त्याने सदरची मोटरसायकल ही गणेशगाव पाटी (ता. माळशिरस) येथील त्याच्या नातेवाइकाकडून 10,000 रुपयांना विकत घेतली असून त्याची कागदपत्रे लवकरच देतो, असे सांगितले. सदर तपासामध्ये ती मोटरसायकल बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीनेच चोरली असण्याची शक्यता असल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करून सदर आरोपीस विश्वासात घेऊन तपास केला असता, त्याने माळशिरस, वेळापुर, टेंभुर्णी, इंदापूर येथून मोटरसायकली चोरल्या असून त्या शिरसाव (ता. परांडा) व बेलगाव (ता. बार्शी) येथे प्रत्येकी 10,000 रुपयांना विकल्या असल्याचे सांगितले.
सदर माहितीवरून शिरसाव येथून प्रत्येकी 25,000 रुपयांच्या एकूण चार आणि 30,000 रुपयांची एक अशा एकूण पाच मोटरसायकली, असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातुपते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धारशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संतोष गिरीगोसावी, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोंगडे, फिरोज बारगिल, अर्जुन गोसावी, रवी लगदिवे, महेश जर्हाड, रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.