हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रस्त्यावरील घटना
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात फरारी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी ज्योती राक्षे (वय ४४, वर्षे, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान शेवाळेवाडी चौकात सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या सार्वजनिक रोडवर यातील फिर्यादी यांचे पती हनुमंत औदुंबर राक्षे (वय ६७, रा. टकलेनगर, मांजरी बुद्रुक, पुणे) हे शेवाळेवाडी चौकातून रस्त्याच्या कडेने जात असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या यातील नमूद ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवून नमूद ठिकाणी मोटारसायकलस्वारास जबर ठोस मारून, गंभीर जखमी करून, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन, अपघाताचे ठिकाणी न थांबता तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर पुढील तपास करीत आहेत.
