दरोडा व वाहनचोरी पथक-१ गुन्हे शाखेची कामगिरी : दोघांना घेतले ताब्यात
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज
सिंहगडरोड, पानमळा भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे या भागात होणारी मोठी चोरीची घटना टळली आहे.
लोणी काळभोर परिसरात अज्ञात आरोपींनी बंदुकीतून गोळीबार करून एका व्यावसायीकाला त्याच्या कंपनीत रात्रीच्या दरम्यान येऊन त्याला लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. सदर घटना घडताच वरिष्ठांनी सदर गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
शनिवारी १५ ऑगस्ट रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रं १, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पोलीस नाईक मॅगी जाधव व धनंजय ताजणे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून नमूद गुन्ह्यातील दोन अज्ञात आरोपी हे शिंदे पूल चौक, दांगट इस्टेटजवळ, शिवणे, पुणे येथे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हा विकणे कामी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने, मिळालेल्या माहितीच्या जागी पोलीस दबा धरून थांबले असता, तेथे दोन अज्ञात इसम काळ्या रंगाच्या शाईनवरून येत असताना दिसले. त्यांची हालचाल संशयित वाटल्याने त्यांना शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता सदर गुन्हा हा त्यांनी त्यांचा अजून एका साथिदार नामे कार्तिक इंगवले याच्यासह केला असल्याची कबुली दिली. म्हणून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे- स्वप्नील लहू साठे (वय १९, रा. शिंदे पूल, शिवणे, पुणे) आणि अक्षय यादवराव काकडे (वय २१, रा. दांगट इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवणे, पुणे) अशी आहेत. त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल मिळून आला आहे.
या दोघांचा तिसरा साथिदार नामे कार्तिक इंगवले याला यापूर्वीच युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशन करीत आहेत. या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकरिता लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख (गुन्हे शाखा १) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिल शेवाळे, सपोनि जुबेर मुजावर, सहायक पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार नीलेश शिवतरे, पोलीस नाईक मॅगी जाधव, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे, गणेश पाटोळे व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, हृषीकेश कोळप दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
