सुहास झालटेसह चार जवानांची कामगिरी : आयएएस रमेश घोलप यांच्या कार्याला मानवंदना
बार्शी :पवन श्रीश्रीमाळ
महाराष्ट्र 360 न्युज नेटवर्क
नवी मुंबईतील पोलीस खात्यात सेवा बजावणाऱ्या बार्शीपुत्राने महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाई या शिखरावर जाऊन तिरंगा फडकवला. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाच्या चार जवानांनी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई सर केले. या जवानांनी तिथे महाराष्ट्र पोलीस ध्वज, भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला, तसेच बार्शीचे सुपुत्र आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचा फोटो झळकावत त्यांच्या कार्याला ही मोहिम समर्पित केल्याचे या जवानांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाई येथे तिरंगा फडकवत पोलीस जवानांनी राष्ट्रगीत गात देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. या मोहिमेत सध्या नवी मुंबई पोलिसात सेवा बजावणारे मूळचे बार्शीतील जवान सुहास झालटे, मुंबई पोलीस वैजिनाथ मार्तंडे यांच्यासह तुषार पवार आणि रवींद्र कोळपे हे जवानदेखील सहभागी झाले होते. या मोहिमेचं नेतृत्व एलब्रूस-किलीमांजारो सर करणारे तुषार पवार यांनी केले.
रविवारी (15 ऑगस्ट) पहाटे 4 वाजता या चौघांनी शिखर चढायला सुरुवात केली होती, तर सकाळी 9 वाजता ते उंच शिखरावर पोहोचले. या शिखराची उंची 1646 मीटर एवढी असून, नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांत हे शिखर वसलेले आहे.
रमेश घोलप यांनी हलाकीच्या परिस्थितीतून यशाचे शिखर गाठले आहे. त्यामुळेच, कळसूबाई या उंच शिखरावर चढून आम्ही सनदी अधिकारी रमेश घोलप यांचा फोटो झळकवला. ज्याप्रमाणे हे शिखर गाठणे अवघड आहे, त्याचप्रमाणे घोलप साहेबांचा प्रवासही अवघड होता, पण त्यांनीही यशाचे शिखर गाठून सर्वकाही शक्य असल्याचे दाखवून दिल्याचे सुहास झालटे यांनी म्हटले.
रमेश घोलप यांनी बार्शीतील युवकांना स्पर्धा परीक्षांची प्रेरणा दिली. उमेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेकांना मदतही केली. त्यामुळेच झारखंडमध्ये देशसेवा बजावणाऱ्या बार्शीपुत्राचा आम्हाला अभिमान वाटतो, म्हणूनच आज त्यांचा फोटो आम्ही शिखरावरून झळकवला.
- सुहास झालटे, जवान,
