चतुरशिंगी पोलीस स्टेशन :पुणे शहरात मोठी खळबळ
महाराष्ट्र ३६० न्युज
पुणे : गेली अनेक वर्षे बेकायदा सावकारी करून दहशतीने घरजमीनी बळकावणार्या औंध येथील नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड तर शिवाजीनगर येथील सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे, पिंपळे निलखचा राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ, विधाते वस्ती औंध येथील सचिन गोविंद वाळके,संदीप गोविंद वाळके यांचे विरुद्ध मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
विश्रामबाग पोलिसांच्या तपासात आरोपी बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने व्याजाने पैसे देत होते. पैसे वसूल करण्यासाठी रीव्हॉल्व्हरचा धाक दाखवणे, दहशत पसरवण्या साठी हवेत गोळीबार करणे आणि जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने जमीनी बळकवण्यासाठी स्टॅम्प पेपरवर सहया व अंगठे घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा बेकायदा सावकारीतून अनेकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती तपासात प्राप्त झाली आहे. अशा बेकायदा व्यवहारांतून मोठया प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुख्य आरोपी नानासाहेब गायकवाड व त्याच्या साथीदारांविरुध्द गेल्या काही वर्षात खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी जबर मारहाण करणे, पळवून नेणे, बेकादेशीर जमाव जमविणे, फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या सावकारी करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
नाना गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व साथीदारांसह अनेक गुन्हे केले आहेत. कुटुंबियांच्या साथीने स्वतःच्या अधिपत्याखाली संघटीत गुन्हेगारांची टोळी निर्माण केली आहे. प्रतिष्ठीत तसेच महत्त्वांच्या व्यक्तींसोबत संबंध प्रस्थापित करून आपलं वजन वाढवणे आणि सर्वसामान्य गरजुंची पिळवणूक करण्याचा सपाटा या टोळीने लावला होता. बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे देवून अव्वाच्यासव्वा व्याज लावून वसूलीपोटी घरजमीनी बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमवली आहे.
सर्व सामान्यांसह प्रतिष्ठीत नागरिक व व्यवसायिकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. भितीपोटी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नाहित या पार्श्वभूमीवर परिमंडळ चार चे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत प्रस्ताव सादर केला असता पुणे शहर पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii). ३(२). ३(४) ३(५) चा अंतर्भाव करणेचे आदेश पारीत केलेले आहेत.
सदरची कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस ठाणे अंतर्गत विश्रामबाग विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४८ वी कारवाई आहे. अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यापासून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा चंग बांधला आहे. गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारांच्या हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल या उद्देशाने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत.
