युनीट ३ची कारवाई : सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील घटना
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज
सिंहगडरोड, पानमळा भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे या भागात होणारी मोठी चोरीची घटना टळली आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे किरण शिवाजी खवळे (वय २२, रा. निगडी), विल्यम्स जॉन पीटर (वय २२, रा. हवेली), वैभव राजू खिरीट (वय २४) व आकाश गोपीनाथ मते (वय २३, रा. कोल्हेवाडी पुणे) हे तिघे जण रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसॆ, तीन मोटारसायकली, नायलॉन दोरी घेऊन सिंहगड रोड, पानमळा भागातील ज्वेलर्स किंवा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हॉटेल ग्रीनफील्ड समोरील मोकळ्या जागेत १३ ऑगस्ट रोजी रात्री ९.१० च्या दरम्यान थांबले होते.
या तिघांबाबतची माहिती युनिट ३चे कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि राजेंद्र मारणे यांना मिळाली होती. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३चे पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. अमृता चौरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
