भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना : तीन महिलांच्या तक्रारी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज
काही वर्षांपूर्वी ‘धूम’ चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटामध्ये आरोपी गाडीवरून चोऱ्या करत. तशीच काहीशी घटना कात्रज भागात घडली आहे. एकाच दिवशी या तिन्ही महिलांना दुचाकीवरून दोन चोरट्यांनी येऊन लुटले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, १३ ऑगस्ट रोजी कात्रज भागातील राजस सोसायटीकडून कात्रज तळ्याकडे पायी जात असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने दुचाकीवरून ओढले. यातील अर्धा भाग तुटून पडला व अर्धे मंगळसूत्र (सुमारे २० हजार रुपये किमतीचे) हिसकावून नेले. तसेच एक २१ वर्षांची महिला गाडीवरून कात्रजच्या ओव्हर ब्रिजवरून कात्रजकडे जात असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजारांची चेनदेखील दुचाकीवरील चोरट्याने ओढून नेली. त्यानंतर कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान अँटमॉसफेअर सोसायटी समोरून पायी जात असलेल्या महिलेच्या पँटीच्या मागील खिशात ठेवलेला मोबाईलदेखील दुचाकीवरील चोरट्याने हिसकावला आहे. त्यामुळे ‘धूम’ स्टाईल पद्धतीने कात्रज परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता भारती विद्यापीठ पोलिसांसमोर आहे. या तिन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात हे करीत आहेत.
